Tuesday, June 12, 2018

फक्त दोन

मी एका मोठ्या खडकावर बसलो होतो समोर निळंशार पाणी चहूबाजूंनी हिरवळ, एखादा मासा हलला की  मग पाण्यावरची ती वलय. आकाश पावसाच्या ध्यनमग्न गांभीर्यानं स्थिर आणि सूर्य बुडताना तिरपे किरण लांब कुठे कुठे विंगेतून अभिनेत्याच्या चेहेऱ्यावर मारल्यासारखे. वारा सुटलाय हलकासा केस भूर भूर उडावे एवढाच, समोरच्या वाळक्या झाडावर बगळा बसलाय त्याचे पंख हळुवार तो बसवतोय एव्हडा मंद वारा. पाण्याचा आणि शेवाळाचा वास आणि शेजारच्या रान फुलांचाही.  बेडकांशिवाय दूर रहदारीचे आवाज आणि एखाद प्रेमी युगल त्या पलीकडल्या पायवाटेवरून जातंय. मी माझ्या डोळ्यांनी ते सर्व कस बघावं ? अस की प्रत्येक दिशेचं चित्र डोळ्यांच्या कान कोपऱ्यात रुतुन बसावं. अस्स म्हणून  माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या आहे. हे दुःख ना आनंद ही असं. पाठीखालचा खडक मऊ होऊन मवाळ झालाय आणि हि संध्याकाळ रमणीय म्हणून साजरी करायला एक मोर पाठवलाय, फक्त तो दिसतो नाहीसा होतो, दिसतो नाहीसा होतो.
मी डोळे बंद करतो ते तिच्या आठवणीत तेव्हड्यात आकाशाचं वर्तुळ कापत एक पांढर स्वछ विमान उडतंय शांत. अचानक सरसर ऐकू आली आणि अंगावर काटा उगवला, त्या शहाऱ्याला मी शंकराला वाहिला. एक चतुर गुढग्यावर बसून काही तरी निरखून बघतोय.
उंच टेकडीवर शंभरटक्के प्राणवायु फुफासात शिरते तेव्हा आपणही ढगच होतो नाहीका ? अचानक हलकं अनुभवतोय शिवाय कापडाचा पोत ही सुळसुळा झालाय. मग हळू हळू काही गोष्टी बदलतात एका विचित्र किड्याचा आवाज येतो  डोळे जड झालेला मी प्रयत्नांनी डोळे उघडतोय डोक्याखालचा हात मुद्दाम हलवतोय, आश्चर्य हे कि जड झालेला खांदा दुसऱ्या हातानं दाबतोय आणि तळपायांनां मुग्यांचं वारूळ चिकटलंय मी कंटाळून लाथ मारतो स्टूलावरचा पंखा मागे सरकतो.
विचित्र किड्याचा आवाज आजून ऐकू शकतोय पण आठवत नाही त्याचा आकार.  शेवटी उशी खालचा मोबाईल सरकतो तोच हा इलेकट्रोनिक किडा.  कपाळावर हाथ मारून बसलोय तोवर घामाच्या धारा त्वचेतुन मुक्त होत आहे. बाहेर बांबूंच्या कमानीवर उंच ते रंग मारत आहे, एक कबुत्तर जाळी बांधतोय आणि एक छतावर डांबर लावतोय. वितळून वाहण्यात माझा घाम जिंकलाय. खाली दुकानांच्या रांगा प्लास्टिक ची निळी झालर लावताय बांबू रोवतोय, कोपऱ्यावर पोरं छत्र्या विकतायत. अजून तस शांत आहे केवळ घड्याळ चुकीच्या वेळी चुकीचे काटे फिरवताय. मनगटाच घड्याळ, मोबाईल मधली वेळ आणि भिंतीवरच घड्याळ सगळे एका सुरात? मग ? मी उशिरा उठलोय काचेतून दिसणारी पावसाळी सकाळ किती गाफील आहे पाऊस आला नाहीच, मला कळलंच नाही किती वाजले आणि परत तेच उशीर झालाय.
घड्याळ, चष्मा, पाकीट, डबा, ब्याग, छत्री, रुमाल हे सोबत घेतलं आणि न दिसणारी चिडचिड, पक्ष, धर्म, दर्जा, आदर्शवाद, दर्शन, मनोवैज्ञानिक दृष्टिकोन, समाज भान, सोंदर्य शात्र, शब्द शस्त्र हे सगळं स्वतःहून जागा मिळेल तिथे घुसलं.
घराच्या बाहेर ऍम्ब्युलन्स वनवे नी येतेय तिचा आवाज घुमतो मग मंदिरांच्या घंटांचा मग अजान, मग शाळेच्या मुलांचा गोंधळ मग राष्ट्रगीत, मग भाजीवाले फेरीवाले, मग भांडण, हे सगळं कानावर येतेय.
डोळ्यांनी तेच दिसतंय जे कानांनी ऐकतोय रगडा आणि पाणीपुरी, मग मटण शॉप मग आगरबत्तीवाला मग उघड गटार सगळं नाकानी अनुभवतोय.
घराच्या बाहेर धक्के आणि वळून बाजूने रस्ता काढत मी बरोबर १०:३० ला प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर उभा आहे
समोरच्या गर्दीत एक गुलाबी ओढणी वाऱ्यावर उडते आहे ती वळत पर्यंत चर्चगेट फास्ट दणदनत पोचली आहे.

डब्यात उभं राहिल्या राहिल्या आज काय ? आबिदा की  राजन साजन की वसंतराव की सिगारेट आफ्टर सेक्स?
हेडफोन विसरलो त्यामुळे बाहेर बघणे . आय लेवल हिरवळ, कचरा, इमारती,हिरवळ, कचरा, इमारती बिलो आय लेवल निसर्गविधी, रेल्वेट्रॅक, कचरा एखाद मेलेलं जनावर वगरे, गडीच्या आत माणसं सगळी आपापल्या मोबाईलच्या चोकोनावर बळजबरी करताय.
उभ्याचे वाद चर्चा वाद चर्चा मग ढकला ढकली दो हजार उन्नीस मी देखो क्या होता है, बघून चढ रे !, तुझ्या मायला दारात कश्याला उभा रे ?,  उतरा दादर !
धक्याने मी पडतोय कुणावर तरी, अरे चष्मा !
मी डोळे घट्ट बंद केलेत उभा राहीलॊ , लांब स्वास घेतला कुणीतरी आवाज दिला हळुवार
तुमचा चष्मा ! मी वळून बघतो आईला - गुलाबी ओढणी
मुद्दाम डोळे चोळतो परत पायाशी कोणी तरी धडकतंय मी लाथच मारतो पंखा स्टूलावरून पडतो.







No comments:

Post a Comment

बापा साठी