Monday, June 18, 2018

पेंटिंग स्टुडिओ आणि काळ मांजर

स्टुडिओत एकच गोंधळ माजलेला रात्रीचे एक वाजलेले माझ्या मांडीवर मोठी जखम झालेली त्यातून रक्त वहायला लागलं. मी शेवटी शांत बसलो. मी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा ताबडतोब मिळाल्यामुळे फार निवांत वाटू लागलं.
एक छोटं पांढर शुभ्र मांजराचं पिल्लू मी पाळलेल होतं आणि नेमकं त्याच आई सोबत हिंडणार काळ पिल्लू स्टुडिओतल्या भांड्यातून दूध प्यायचं माश्यांचे तुकडे पळवायचे वर मी पाळलेल्या पिल्लाच्या अंगावर धावून जायचं, ओरबाडायचं.
अमु प्रिंटिंग स्टुडिओच काम आटोपून निघून गेला, मी वॉटर कलरचा एक वॉश दिला आणि बाहेर च्या शेड मध्ये बसलेलो. तेव्हड्यात तेच काळ मांजराचं पिल्लू तिथे आलं आणि चुपचाप बसलेल्या पांढऱ्या मांजरावर धावून गेलं, आधी आवाज करत त्याला दूर केल, पण परत जेव्हा ते बशीतला वाट घ्यायला आलं अचानक मी एक लाकडी ठोकळा त्याच्या दिशेनं फेकला नेम धरून मारल्या सारखा तो त्या पिल्लाच्या पोटावर बसला. ते पिल्लू धाडकन पडलं मिर्गी आल्या सारखं कापू लागलं. त्याच थरथरणारं शरीर शांत होत गेलं, मी घाबरलो उगाच एवढ्याश्या पिल्लाचा जीव जाऊ नये म्हणून मी त्याला उचलून गोंजारलं. मांडीवर थोपडलं, थोडं पाणी पाजलं ते कित्ती वेळ हालचाल न करता पडून राहिलं.

माझ्या टेबलच्या कप्प्यात मी त्या पिल्लाला ठेवलं. थोड्या वेळाने मी पुन्हा बघितलं आता ते धिटावलं होतं. मी त्याच्या अंगावरून हाथ फिरवावा म्हणून त्याच्या जवळ गेलो त्यानं जोरात पंजांनं फटकारा मारला, धावलं आणि ते अगदी अडचणीच्या जागी जाऊन बसलं.  तिथे स्टुडिओचे बरेच सामान ठेवले होते, पैंटिंग नाईफ होते, आणि तारांचा गुंताही होता. त्याच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला पण अडगळीत ते पिल्लू अजूनच आत शिरत गेलं.

एका क्षणासाठी स्वतःच्या वागण्याची चीड आली, लाजही वाटली त्याच क्षणी असं वाटलं की हे पिल्लू आता ठीक आहे हे परत आपल्या काळ्या रंगावर जाईल, आणि पुन्हा नाही तेच प्रकार करेल. एकदा स्टुडिओत झोपलेलो तेव्हा हेच पिल्लू छातीवर बसलेलं त्याच्या गुरघुरणाऱ्या मऊ आणि छोट्या अंगानं एक विचित्र अनुभव मला दिला होता. स्वप्न बघतांना भुभुळ हलली की मांजर डोळ्यांवर पंजा मारते असे किस्से ऐकले होते. आणि इजिप्तच्या इतिहासात परलोकांशी नातं जोडण्याच्या मांजरांच्या दंतकथाही वाचल्या होत्या.

मी त्याला पकडण्याचा प्रयत्न सोडला वळलो ते मागे पुढे न बघता, त्या कचाट्यातून बाहेर येतांना एक जाड तार मांडीत घुसला प्यांट फाटली आणि मोठा चिरा पडला, रक्त वाहू लागलं. मी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा ताबडतोब मिळाल्यामुळे फार निवांत वाटू लागलं.

हा घडलेला प्रसंग दुसऱ्या दिवशी मी माझ्या मित्रांना ऐकवला.  कांबळे हसला त्यानं माझं शर्ट बाहेर आलेलं जानवं आत घेण्याचा इशारा केला. गप्पा रंगल्या आणि संपल्याही  कांबळे जाता जाता म्हणाला के काळ मांजरीचं पिल्लू माझी जिम्मेदारी मी त्याला स्कल्पचर डिपार्टमेंट मध्ये नेतोयं मला मांजराच्या शरीर रचनेचा अभ्यास करायचा आहे. स्केचेस करून मस्त एक क्ले मॉडेलिंग करेल त्याला रंगाचं बंधन नाही .. तो हसला निघून गेला.


No comments:

Post a Comment

बापा साठी