Tuesday, June 12, 2018

सिंक

प्रत्येक गोष्टीचा जसा अंत असतो तस हे ही संपलं.  खिडकीच्या काचेवर लावलेला फोटो ती वारंवार बघत होती आणि सिंक मधली एक एक प्लेट स्वछ करत होती मग मधेच तीनं ओल्या हाताने त्या फोटो वरची धूळ साफ केली आणि क्षणात तो फोटो फाडून फेकून दिला.
सिंकच्याच नळाने तिने चेहऱ्यावर पाणी मारले आणि टेबलावर बसून भाजी चिरण्यात गुंग झाली. तिला काही गोष्टी स्पस्ट आठवत होत्या देशमुखांच्या संपन्न घरात सुसभ्य पध्धतीने घरची मोठी माणसं  बसली होती आणि बाजूच्या खुर्च्यांवर सगळ्या वरिष्ठ बायका बसल्या होत्या. फॅमिली फोटोग्राफ घेता यावा अश्या ऐटीत बसलेली ही  मंडळी फार गंभीर दिसत होती. घडलंही असाच काही होतं.
भाजी चिरता चिरता ती उठली फ्रिज मधून अजून काही भाजी काढली. लक्ष सिंक कडे गेलं नळ बंद करायचा राहिला होता. ती टेबल वर बसली पण फाटलेल्या फोटोकडे तीच लक्ष गेलं, तो चेहरा किती गोंडस होता आणि ते स्मित किती मोहक.

पालकाच्या जुडीला हलकेच हलवलं, माती दूर झाली आणि एक हिरवीकंच अळी खाली पडली. तिची वळवळ फार किळसवाणी होती.  तशीच सुरकुत्यांची त्वचा  तिच्या डोळ्यांसमोर आली, आपल्या लहान पाणी आपण बाहुल्यांना आंघोळ घालीत बाथरूम मध्ये खेळतांना कोण आलेलं . त्या छोट्या मुलीचे डोळे चमकले आणि ती हसू लागली आणि तोही हसला.
डस्टिंग पॅड घेऊन कचरा ट्रॅश बिन मध्ये टाकला तीच लक्ष सिंक कडे गेलं, नळ वाहत होता.  तिच्या चेहऱ्यावर भीतीच आवरण चढलं तिने आजू बाजूला बघितलं क्षणात वाटून गेलेलं की  देखमुखांच्या घरची ती सगळी गंभीर माणसं तिच्या खिडक्यांच्या बाहेर उभी आहेत.

ती कोमेजून शांत बसली पाणी वाहण्याचा आवाज तिच्या कानात घुमत होता तेव्हा त्यानं बाथरूमचा दरवाजा अलगत बंद केला व बाहुलीचे कपडे आणि तिचे कपडेही तो हळू हळू काढू लागला.

हे आठवताच तिचं अचानक भिंतीवर लक्ष गेलं ट्यूबलाईट खालून व मागच्या भिंतीच्या आगदी वर पासून पाणी वाहू लागलं, तिने सिंकचा नळ जोरात फिरवला तो बंद झाला, पाण्याचा आवाजही आणि भिंतींवरून ओघळणारं पाणीही बंद झालं.

देशमुखांच्या घरात न्याय पालिका भरली होती. घरातल्या सगळ्यांना कळलं होतं शिवाय साक्षी पुरावाही होता.
कुणी तरी विचारल कृपालीनी तू असं का केलं ? सगळ्यांचे डोळे तिच्या उत्तरासाठी स्थिरावलेले.
ती म्हणाली मी प्रौढ आहे माझ्यासाठी योग्य काय, आयोग्य काय हे मी ठरवू शकते . देशमुखांच्या घराला माझं प्रेम  अशोभनीय किंवा विकृत वाटत असेल तर मी हे घर सोडायला तय्यार आहे. सगळे आश्चर्यानं तिच्या कडे बघत होते. दादा अचानक वळला आणि जोऱ्यात कानाखाली वाजवली.
तिच्या डोळ्यात पाणी आलं.
आताही तिच्या डोळ्यात पाणी आलं कारण तीच बोट कापल्या गेला होत. तिने बोटावर पट्टी बांधली. तिने टेबलावरच्या फोटोकडे पुन्हा पाहिलं .. आणि म्हणाली असं सोडूनच जायचं होतं तर प्रेम का केलस ?

सात जून तारीख उलटून गेली तरीही पाऊस आला नाही, पंखा ही मस्करी करतोय असं वाटू लागलं, तहानलेला जीव कासावीस होऊ लागला तिने फ्रिज उघडला थंड पाणी प्यायली तरीही देशमुखांची ती सभा तिच्या डोळ्यां समोर राहिली .

मग त्याने विचारलं - तू माझ्याशी बोलत नाही मी मोठा असून मला मान देत नाही तरीही तुला तुझी बाजु आम्ही सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. सुमित्रा तू नेमकं काय बघितलं ते सांग.  इथे सर्वच प्रौढ आहेत त्यामुळे लपवा लपवी करण्याची गरज नाही. हे सगळं बोलतांना तो बोलत किंवा ओरडत होता, त्याच नजरेनं तो तिच्या कडे बघत होता जसा प्रत्येक वेळी तो बाथरूम मध्ये अंघोळीचा खेळ खेळतांना बघायचा.
पुन्हा एकदा सिंकचा नळ सुटला, सिंक भरून पाणी वाहू लागल, भिंतींतून चारही बाजूने पाणी वाहू लागले.  त्वचेवर अळी सरकावी आणि तो चिकट पदार्थ सर्वांगाला लागावा असं पुन्हा पुन्हा अनुभवला होतं.

सुमित्रेचा आवाज अडखळत होता पदर सावरत आणि थुंकीचा घोट घेत ती म्हणाली मी कृपालीनी आणि तिच्या मैत्रिणीला नागडं बघितलं.  तो पुन्हा विचारू लागला नागडं काय करत होत्या त्या? बायकांच्या माना झुकल्या आजीनं म्हंटल अग एकाच वयाच्या मुली वर घनिस्ट मैत्रिणी, एकमेकांसमोर नसेल वाटली लाज.  चेंज करत असतील, तुला आपलं भलतं सलत का वाटलं कोण जाणे ? पण सुमित्रानं स्पष्टपणे सांगितलं साहेब मला वाटलं त्या प्रेम करत होत्या.  तेव्हाच भाऊमामा तिथे आले आणि त्यांनीही  प्रकार पहिला.
दादाने विचारलं  भाऊमामा तिथे कश्याला गेला? सुमित्रानं त्याचंही उत्तर फट्कन दिलं, म्हणजे काय ते मला शोधात आले. तिने जीभ चावली ती पुढचं काही बोलण्या आधीच घरातला सगळ्यात उच्चशिक्षित काका उभा राहिला त्यानं विचारलं कृपा तुला कसं कळलं ग पहिल्यांदा की तुला मुलगीच साथीदार हवी आहे ?
ती शांत  राहिली फक्त ओठांची चळवळ केली आणि रोखून बघत म्हणाली लहानपणी बाहुल्यांची आंघोळ घालतांना.

तीनं परत घट्ट नळ बंद केला.  घरात आलेलं सार पाणी कोरडं झालं, टेबलवरचा फाटलेला फोटो उचलला आणि लगेच फोन लावला कनेक्ट होताच ती म्हणाली तू येणार आहेस की  नाही माझ्या कडे परत? बोलतांना ती हुंदके देत होती, अचानक दार वाजलं, तीच होती. त्यांनी घट्ट मिठी मारली. डस्टबिन मधली अळी कचऱ्यात वळवळत राहिली. 

No comments:

Post a Comment

बापा साठी