Tuesday, June 26, 2018

जाहिरात आणि मालिका

आयुष्यात एकदा तरी असं  होतं , तुम्ही चौदा चे असा, चाळिशीचे असा व अगदी साठी उलटलेली असली तरीही तुम्ही एखाद्या अश्या व्यक्ती समोर येता कि तिच्या डोळ्यांमध्ये बघताच न शमणारी ज्वाळा तुमच्या आत पेट घेते. 
ह्या सगळ्यात अस्वस्थ आणि दुःखी करणारी बाब ही  कि ती व्यक्ती ज्यांच्या सहवासात आपण जगतो, वावरतो  त्यांच्या पैकी ती नसते. 
न शमणारी ज्वाळा वगरे वाचायला जरा जड वाटत असलं तरी सुलभाला त्याचा अर्थ कळत होता. तिच्या नवऱ्याने त्याच्या वोर्कस्पेस समोर एक नवीन प्रिंट आऊट लावलं . हे नवीन नव्हतं कारण मोटिवेशन साठी काही तरी मजकूर तो सॉफ्टबॉर्ड वर लावायचाच. तो जाहिराती साठी जिंगल लिहायचा.  विशेष म्हणजे त्याने ह्या वेळी जे प्रिंट आऊट लावलं होता त्या वर लिहिला होतं " I fall in love again"  आता मराठी मालिका बघणारी बाई तिच्या डोक्यात काय काय चक्र चालतील? ते सुरु झाले. 

परिस्थिती हाता  बाहेर जाऊ नये म्हणून सुलभा स्वतः ची विशेष काळजी घ्यायला लागली, नीट नेटकी रहायला लागली. तो बाहेरून घरी आला की आपण फ्रेश दिसतोय ना ह्यावर ती लक्ष देऊ लागली. अगदी जाहिरातीतल्या नटी सारखी. 
स्वयंपाक घरापासून ते बेडरूम पर्यंत घरातल्या प्रत्येक प्रॉडक्ट वर जाहिरातींचा प्रभाव जाणवू लागला होता. सकाळची किशोर स्पेशल गाणी ती रेडिओवर ऐकायची तेव्हा जाहिरात लागली कि  आवाज मोठा करायची आणि टीव्ही वर तर मालिका सुरु होताच दुसऱ्या चॅनलवर  नवीन जाहिराती  बघण्या साठी ती चॅनल चेंज करायची. 

चहा बदलला, आंघोळीचं साबण बदललं, डोक्याला लावायचं तेल बदललं, खिडक्यांचे पडदे बदलले. आणि रात्री चे नाईटगाऊनही.  पण ह्या माणसात काही बदल जाणवत नव्हता आणि घरात काही बदल होत आहे हे त्याच्या लक्ष्यात येऊ नये व त्यावर बोलू नये इतका कामात गुंगही नव्हता, बर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं  हे असच आहे असं सुलभाला वाटत होतं. जाहिरातीच्या वेळी टीव्ही चा आवाज बंद करनाऱ्या घरात हे काय घडत होतं  


तिने सहज नवऱ्याला विचारलं तुम्ही जाहिरातीं साठी कस काय लिहिता , म्हणजे सुचत कस ? तो म्हणाला काही सगळं खोटं बोलायचं , सोपं आहे टूथपेस्ट बदलले कि प्रमोशन आणि अंडरवेअर बदलली कि नवी गर्ल फ्रेंड. 
तिने नाक मुरडत दुर्लक्ष केलं. 
आता त्याच लक्ष आपल्याकडे नाहीच हे सुलभाच्या लक्ष्यात येताच तिने घरी बोलणं कमी केलं, पण मेकअप नाही. तोही गप्प गप्प राहू लागला.  मुळात पूर्ण बोलणं बंद होण्यापूर्वी काय तो सोक्ष मोक्ष लावावा असं सुलभाने ठरवलं. 

आज रविवार आणि सकाळी कॉफी घेतांना तो "आप कि अदालत" बघणार हे नक्की होते. सुलभाने हळूच केबल ची वायर काढून ठेवली आणि दहाच्या ठोक्याला ती ही कॉफि घेत त्याच सोफ्यावर बसली. त्यांनी एकमेकांकडे बघितलं. नवऱ्याने विचारलं काय झालं ?  सुलभ म्हणाली - काढून टाकलाय. मग त्याने विचारलं मग मी घरात रहायचं ना? का असा का विचारता ? तो म्हणाला आता मंगळसूत्र काढून टाकलाय म्हणजे ? 
ती गप्पच राहिली तिला आठवलं रात्री सोन्याचा तार टोचल्यानं तीन मंगळसूत्र काढून ठेवलं होतं. 
ती उठायला गेली तर नवरा म्हणाला बस सांग तरी कोण आहे तो ? 
ती म्हणाली आधी तुम्ही सांगा ना ! नवरा म्हणाला मला काही अंदाज नाही तुझा कोणी जुना मित्र वगरे आहेका ?
सुलभा चिडलीच म्हणाली अरे काय माणूस आहे,  स्वतःच पितळ झाकायला माझ्यावर काय संशय घेतोय ? 

नवरा शांत राहिला, काहीच बोलला नाही, घर ह्या अबोल्या सप्तहात हळवं झालं. त्यात कोळ्याने कोपऱ्या  कोपऱ्यावर चार दोन जाळी विणली. दिवसा ढगाळ वातावरण असल्यानं घरात स्वछ प्रकाशही आला नाही. 
कधी नव्हे ती बाल्कनीत उभी राहिली. खाली झोपडपट्टी, तिथे नवरा बायकोची भांडण, त्याचा आवाज नेहमीच यायचा. त्यांच्या भांडणातून आपण प्रोत्साहन मिळवावं असं वाटलं, या उलट इथे आज सगळं शांत. उलट एका खिडकीतून तिला नको तो प्रकार दिसला. ती चिडली हि आणि लाजही वाटली. ह्या  लोकांना काही काळ  नाही  ती जरा  मोठ्याने बड्बडली. काय झालं ग ? नवऱ्याने विचारलं 
सुलभाचं लक्ष परत सॉफ्टबॉर्ड वर गेलं तिच्या नवऱ्याने नवीन प्रिंट आऊट लावलं होतं. 

"If forever really exits, I will really like to spend it with you" 

नवऱ्याने परत विचारलं काय झालं ? सुलभ म्हणाली काही नाही माझ्या मालिकेची वेळ झालीय जरा टीव्हीचा केबल लावून द्या.  

No comments:

Post a Comment

बापा साठी